Events

    गडभ्रमंती : किल्ले हरिहर, किल्ले अंजनेरी, किल्ले रामशेज (२८ व २९ डिसेंबर २०१३ )

सप्रेम जय शिवराय !! 

गडवाट परिवाराने गेल्या वर्षाअखेर तोरणा ते राजगड गडभ्रमंती केली होती. गेली सतत २ वर्षे आपण गडभ्रमंती करत, इतिहासाचे पावित्र्य जपत, सामाजिक कार्यात सहभाग घेत हा ऐतिहासिक वारसा टिकविण्याचा, तो पुढे नेण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. 
याच अनुषंगाने "गडवाट... प्रवास सह्याद्रीचा" परिवाराने किल्ले हरिहर, किल्ले अंजनेरी आणि किल्ले रामशेज हि गडभ्रमंती दिनांक २८ व २९ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित केली आहे. 

संपूर्ण प्रवास :-


१) शनिवारी सकाळी ९ वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात भेटणे. 
२) ९ ते ९.३० वाजता नाश्ता 
३) १० वाजता खाजगी वाहनाने हरिहरकडे रवाना…
४) ११ वाजता गडाचा पायथ्यास येवू आणि ११.३० वाजता हरिहरगड चढाईस सुरुवात. 
५) १.३० वाजता गडाच्या माथ्यावर आणि ३ वाजता गड उतरण्यास सुरुवात 
६) ३-४ दरम्यान जेवण आणि आराम. 
७) ४-५ वाजता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन आणि अंजनेरी गडाकडे रवाना. 
८) सर्वानुमते ठराव करून पायथ्याला किंवा गडावरील मठात मुक्काम. 
९) रविवार सकाळी ५ वाजता उठणे, ६-८ वाजेपर्यंत नाश्ता व गडभ्रमंती
१०) ११ वाजता गडाच्या पायथ्यास येवून रामशेजकडे रवाना. 
११) १ वाजता आशेवाडी गावात जेवण व २ ते ३ वाजेपर्यंत रामशेज गडभ्रमंती 
१२) ६ वाजता नाशिक रोड येथे नाश्ता व घराकडे रवाना. 

टीप :- वेळेत तास ते अर्धा तास मागेपुढे बदल होवू शकतो. 

-----------------------------------------------------------

सोबत काय आणाल :- 

१) खूप थंडी असल्याने स्वेटर आणि पांघरून अत्यावश्यक 

२) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर)

३) ओडोमोस, सुका खाऊ 

४) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज 

५) औषध चालू असल्यास ती सोबत असावीत. 

६) ओळखपत्र 
-----------------------------------------------------------------

ट्रेक फी :-

या ट्रेकची फी ६००/- रु आहे. यात सकाळ-संध्याकाळचा नाश्ता , जेवण आणि इगतपुरी ते नाशिक रोड प्रवास खर्च समाविष्ट आहे.
---------------------------------------------------

तरी इच्छुक गडवाटकरींनी पुढील संपर्क क्रमांकावर आपली नावे नोंदवावी. 

संपर्क: 
सुहास पवार - ०९००४०३६५७३ 
आबासाहेब कापसे: ०९८७०१४०११४ 

टीप :- नोंदणी फक्त फोनवरूनच निश्चित केली जाईल.(किंवा SMS करावा)

----------------------------------------------------------- 

किल्ले हरिहर चा इतिहास :- 

या किल्ल्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

किल्ले अंजनेरी चा इतिहास :-

अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.
----------------------------------------------------------- 
किल्ले रामशेज चा इतिहास :-

छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. संभाजीराजांच्या जीवनावर आधारित कादंबर्‍यांमध्ये व पुस्तकांत या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
मराठा साम्राज्यातील बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला. ‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टÑाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
-----------------------------------------------------------